देशभरात दिवाळी उत्साहात साजरी होत असतानाच जिल्हय़ातील शहरांमधे पहिली अंघोळ जयघोषाने झाली. वार्डावार्डातील नेते-पुढाऱयांनी केलेल्या शक्ती प्रदर्शनाने रात्रीउशिरापर्यंत रस्ते गर्दिने माखून गेले होते. शुक्रवारची रात्रीपासूनच स्थानिक राजकारणाची चक्रे गतिमान झाली होती. याची जिरव-त्याची जिरव करत दिवाळीच्या भल्या पहाटे आघाडय़ांनी उमेदवारांच्या माळा वाजवल्या तर अपक्षांनी आपाले सुट्टे फटाके नेत्यांच्या पायात वाजवले. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आठ पालिकांमधे 3,000 जणांनी अर्ज दाखल केले असून यंदा होत असलेल्या थेट नगराध्यक्षपदासाठी 100 जणांनी बाशिंग बांधले आहे.
दरम्यान, केंदात आणि राज्यातील सत्ताबदलाचे पडसाद स्थानिक पातळीवरही दिसू लागले असून राष्ट्रवादी व काँग्रेसचे प्राबल्य असलेल्या सातारा जिल्हय़ात यंदा सेना, भाजपातही चांगला उत्साह जाणवून येत आहे. आता त्यांची डाळ किती शिजणार हे वेगळे असले तरी जिल्हय़ातील सर्वच नेत्यांची अपक्ष व बंडखोरांमुळे डोकेदुखी वाढली आहे. बुधवारी छाननी व 11 नोव्हेंबरला अर्ज माघारी घेण्याच्या दिवसांपर्यंत मात्र घोडेबाजाराला ऊत असणार आहे.
साताऱयात दोन्ही राजांच्या आघाडय़ांत होणार घमासान लढाई
साऱया जिल्हय़ाचे लक्ष लागून राहिलेल्या साताऱयातील निवडणूक ऐन रंगात आली आहे. राजघराण्यातील मनोमिलन तुटण्याबरोबरच राजस्नुषा वेदांतिकाराजे भोसले यांची थेट नगराध्यक्षपदाची उमेदवारी हा सर्वाधिक चर्चेचा विषय बनला आहे. अर्ज दाखल करतानाच दोन्ही राजांनी दात-ओठ घाऊन दिलेल्या प्रतिक्रियांमुळे दोन्ही आघाडय़ांमधे घमासान लढाई होणार असल्याची स्पष्ट चिन्हे दिसत आहेत. भाजपानेही या लढाईचा लाभ उठवण्याची पुर्ण तयारी केली आहे.
कराडात माजी मुख्यमंत्री विरूद्ध आमदार अशीच रंगत येणार
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत रंगत राहिलेल्या कराडच्या राजकारणाने निर्णायक वळण घेतले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील यशवंत जनशक्ति आघाडीकडे राजेंद्रसिंह यादव, जयवंतराव पाटील, अरूण यादव यांच्यासह दिग्गजांची मांदीयाळी वाढल्याने सत्ताधारी लोकशाही आघाडीला आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निकराची लढत देणे क्रमप्राप्त झाले आहे. त्यातच अतुल भोसलेंच्या भाजपा व उंडाळकराची तिसरी आघाडी रिंगणात आहेच. त्यामुळे कराडात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरूद्ध आमदार बाळासाहेब पाटील हा संघर्ष आत्ताच निर्णायक वळणवर गेल्याचे मानले जात आहे.
फलटणांत राजे गटाने पुन्ह एकदा डावच गुंडाळण्याची आखली रणनिती
विरोधकांनी पाच वर्ष संघर्ष करायचा आणि ऐनवेळी राजे गटाने खेळी करायची ही रित यंदाही अवंलबण्यात आली. ऐनवेळी विरोधकांचे मोठे नेते आपल्या गटात घेत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकरांच्या राजेगटाने विरोधकांचा डाव मोडित काढल्याचे मानले जात आहे.
कोरेगावकरांनी नेत्यांशिवाय निवडणूक घेतली आपल्या हातात : कोरेगावातील राजकारणाने अंतिम दिवसांपर्यंत आपला रंग झाकुनच ठेवला. काँग्रस पक्ष, राष्ट्रवादी, सेना व भाजपातून अर्ज दाखल झाले असले तरी शनिवारी कोरेगावात कोणत्याही ‘बाहेर’च्या नेत्याला प्रवेश दिला गेला नाही. गावची निवडणूक गावातल्या माणसांमधेच राहिली पाहिजे असा न कळत फतवा निघाला की काय? असा प्रश्न निर्माण होईल अशी परिस्थिती होती.
No comments:
Post a Comment